संक्रांत आणि तिळगूळ हे एक अविभाज्य समीकरण आहे… जीवनात जेव्हा स्थित्यंतर होते, संक्रमण होते, तेव्हा मनात कितीही वादळे असली तरी, तोंड गोड असावे. हा या सणाचा उद्देश असावा. त्यानिमित्ताने रांगड्या मराठी लोकांना गोड गोड बोला, असेही सांगितले जाते. पण, अवघा महाराष्ट्र, एक संक्रांत कधीच विसरला नाही, विसरणार नाही.
१४ जानेवारी १७६१ रोजी, संक्रांतीच्याच दिवशी दिड लाख मराठा आपल्या देशासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी , प्राण तळहातावर घेवून, शत्रूला त्वेषाने भिडले, बेभान होऊन लढले…
प्रत्येक संक्रांतीला त्यांची आठवण करणे आणि त्यांच्या शौर्याला मुजरा करणे ही आपली जबाबदारी आहे . इस्लामी आक्रमणे रोखण्यासाठी अखंड हिंदुस्थानातून केवळ आणि केवळ मराठे देशासाठी लढले आणि अमर झाले… हे अवघा भारत जाणतो.
या पानिपतच्या युद्धातील काही घटना, जखमा बनून मराठी मनांवर कोरल्या गेल्या. त्यातील एक म्हणजे, ‘पटेल, क्या हमारे साथ लढेंगे?’ १० जानेवारी १७६१ रोजी, पानिपतवर अहमदशहा अब्दालीच्या या छद्मी प्रश्नावर, जखमी अवस्थेत पडलेल्या सेनापती दत्ताजी शिंदे यांनी उत्तर दिलें होते,
“हां बचेंगे तो औरभी लढेंगे”
हा आहे, मराठी बाणा, मराठी डीएनए…
आपल्या समशेरीच्या जोरावर पार लाहोर ते बंगाल पर्यंत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकत ठेवणारे सेनापती दत्ताजी शिंदे यांचे तेच वाक्य, अवघ्या दहा वर्षात पूर्ण झालेले दिसले. पानिपत नंतर मराठा साम्राज्याला मोठा हादरा बसला होता. दिल्लीतील, पर्यायाने राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व कमी झाले होते. पण अल्पावधीतच मराठे उठून उभे राहिले. शूरवीर महादजी शिंद्यानी १६७१ मध्ये दिल्लीत भगवे वादळ स्थिर केले.मुगल सुलतानाला मांडीवर घेऊन “पाटीलबोवा” अखिल भारतीय राजकारणाचे सूत्रसंचालन करू शकले. केवळ आणि केवळ , छत्रपती शिवाजी महाराजांंनी मराठी मनात जाग्या केलेल्या मराठी बाण्यामुळे! आज त्याच शिवतेजाचे, पराक्रमाचे आणि तमाम शूरवीरांचे स्मरण करताना, त्यांना मानाचा मुजरा करताना मनात अनेक भाव दाटून येतात… राजकीय क्षेत्रात अवघ्या देशाचे नेतृत्व करणारा, सामाजिक क्षेत्रात आपले पुरोगामित्व सिद्ध करणारा, आर्थिक आघाडीवर कायम पुढे राहणारा, सांस्कृतिक, शैक्षणिक, जीवनाच्या सगळ्याच सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर राहणारा हा महाराष्ट्र आज थोडा सुस्त बसला आहे… अंतर्गत विसंवादाने त्रस्त बनला आहे. नैराश्यग्रस्त बनला आहे. त्याला, वेध लागले आहेत, संक्रमणाचे… आपण सर्वांनी मिळून नव्या महाराष्ट्राला प्रगतीचा प्रकाश दाखवावा…
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

संक्रांत,पानिपत आणि मराठी बाणा
•
Please follow and like us:

Leave a Reply