अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला; शरीरावर 6 जखमा; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील ११व्या मजल्यावरील घरात घुसलेल्या एका दरोडेखोराने चाकूने हल्ला केला. गुरुवारी पहाटे २.३० वाजता सैफ आपल्या कुटुंबीयांसोबत घरात असताना ही घटना घडली. सैफने अचानक आवाज ऐकून जाग आल्यावर दरोडेखोराशी सामना केला. झटापटीदरम्यान दरोडेखोराने चाकूने सहा वेळा वार केले आणि त्यानंतर तो पळून गेला. घरातील इतर सदस्यही त्या वेळी उपस्थित होते.सैफ अली खानला गंभीर जखमा झाल्याने पहाटे ३ वाजता त्याचा मुलगा इब्राहिम आणि केअरटेकर यांच्या मदतीने त्याला वांद्रे रेक्लमेशन येथील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले.
सैफच्या प्रकृतीबद्दल हॉस्पिटलची माहिती
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले की, “सैफला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी एक जखम मणक्याजवळ असून ती खोल आहे. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. जखमा जीवघेण्या नाहीत, परंतु नक्की नुकसान किती झाले आहे हे शस्त्रक्रियेनंतरच समजू शकते.”
मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरोडेखोराने घरात प्रवेश कसा केला हे तपासण्यासाठी पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.
DCP (झोन X) दिक्षित गेडाम यांनी सांगितले की, “सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर आरोपी पळून गेला. तक्रार नोंदवण्यात आली असून आम्ही तपास करत आहोत.”
सैफ अली खान यांच्या टीमने प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सैफच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफ सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा पोलिस तपासाचा विषय आहे, त्यामुळे माध्यमांनी आणि चाहत्यांनी संयम बाळगावा.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *