बीड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण असा भव्य कार्यक्रम रविवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकबागेत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती परिषद पदाधिकारी एस. एम. देशमुख यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्यमंत्र्यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, न्यूज १८ लोकमतचे चर्चित अँकर विशाल परदेशी आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सहित विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभर दर तीन महिन्यांनी परिषदेची बैठक होत असली तरी यावेळी प्रथमच बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही बैठक होत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात याची मोठी चर्चा आहे. बैठकीसोबतच बीड जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दिव्यांगांना न्याय मिळवून देणारे दीपक कैतके आणि मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे या दोन्ही बीडमधील सुपुत्रांचा सन्मान करण्यात येणार असून, माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे समाजसेवा, पत्रकारिता आणि कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
किसानपुत्र चळवळीद्वारे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणारे अमर हबीब यांना ‘समाजभूषण’, ज्येष्ठ पत्रकार सुहास देशमुख यांना ‘पत्रभूषण’, तर नवकल्पक कृषी प्रयोगांसाठी ओळखले जाणारे देवडी येथील आदर्श शेतकरी गोरख झाटे यांना ‘कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल, तर दुपारी विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, महिला अध्यक्षा शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव रवी उबाळे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, विभागीय संघटक सुभाष चौरे, तालुका अध्यक्ष सोनवणे तसेच प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शोभना देशमुख यांनी केले आहे.


Leave a Reply