नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत – ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के. मात्र आता केवळ दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार ५ टक्के करात येणाऱ्या वस्तूंवर कोणताही बदल होणार नाही, पण १२ टक्क्यांच्या कर श्रेणीतील वस्तू ५ टक्क्यांत समाविष्ट होतील. यामुळे दैनंदिन वापरातील सूटकेस, हँडबॅग्ज, घड्याळे, कपडे, फुटवेअर, मोबाईल, लॅपटॉप, शाळेच्या वस्तू, टूथपेस्ट, साबण, शैम्पू, टीव्ही, फ्रीज आदी वस्तूंच्या किंमतीत लक्षणीय घट होईल.
याशिवाय २८ टक्के कर लावल्या जाणाऱ्या अनेक वस्तू व सेवांना आता १८ टक्के करदरात आणले जाणार आहे. यात सिमेंट, पेंट्स, टाइल्स, एसी, वॉशिंग मशिन, इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा, विमान प्रवास, हॉटेल-रेस्टॉरंट आदींचा समावेश आहे. परिणामी घर बांधणी, शिक्षण, प्रवास आणि मनोरंजन क्षेत्रातील खर्च कमी होईल. दरम्यान, आलिशान आणि विदेशी वस्तूंवर मात्र ४० टक्के करदर कायम राहणार आहे. यात लक्झरी गाड्या, दारू, सिगारेट्स, मौल्यवान धातू, हिरे आदींचा समावेश असून या वस्तू पूर्वीप्रमाणेच महाग राहणार आहेत.
वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानसह काँग्रेसशासित राज्यांतील मंत्र्यांचा सहभाग असलेल्या गटाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता हा अहवाल आगामी जीएसटी परिषदेत ठेवला जाणार असून अंतिम निर्णय तिथेच होईल. यामुळे यंदाच्या दसरा-दिवाळीत बाजारपेठेत स्वस्ताईची बरसात होणार असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Leave a Reply