छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी श्रद्धेचे प्रतीक असून, त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने आग्रा येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला आहे. यानुसार, स्मारक उभारणीसाठी शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.
मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. त्या ऐतिहासिक वास्तूचे अधिग्रहण करून तिथे महाराजांचे स्मारक साकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. हे स्मारक केवळ त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ठरणार नाही, तर भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ऐतिहासिक केंद्र बनेल.
पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत इतिहासतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांचा समावेश असणार आहे. पर्यटन विभागाला या प्रकल्पाच्या निधी व्यवस्थापन, जमीन अधिग्रहण आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या स्मारकाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत राहील.
या भव्य स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांच्या आग्र्यातून सुटकेच्या थरारक प्रसंगाचे चित्रण केले जाणार आहे. महाराजांनी आपल्या चातुर्य आणि धाडसाच्या बळावर नजरकैदेतून सुटका करून घेतली होती. हा ऐतिहासिक प्रसंग संग्रहालय, दृकश्राव्य माध्यमे, माहितीपट आणि इतर साधनांच्या मदतीने साकारला जाईल.
१६६५ मध्ये झालेल्या पुरंदर तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. मात्र, तिथे त्यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीनंतर नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याच ऐतिहासिक स्थळी आता भव्य स्मारक उभारले जाणार असून, हे स्मारक पर्यटकांसाठी तसेच इतिहास अभ्यासकांसाठी अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारे हे स्मारक भविष्यात ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनेल, अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply