छत्रपती संभाजीनगर: एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही पूर्णपणे निःपक्षपाती राहू शकतो, असे ठाम मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे व्यक्त केले. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, ज्यामुळे त्याला समाजातील प्रश्न आणि समस्यांचे आकलन होते आणि न्यायदानाद्वारे त्यांचे योग्य निराकरण करणे शक्य होते. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे एमजीएमच्या ‘रुख्मिणी सभागृहात’ आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अनेक न्यायमूर्ती चांगले निकालपत्र लिहितात, पण त्यांचे कुणी अभिनंदन करत नाही. नाशिक येथे प्रधान न्यायाधीश असताना मी न्या. बोरा यांच्या चांगल्या निकालपत्राबद्दल फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते, तसेच आजही केले”, असे त्यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराले, न्या. ए.एस. चांदूरकर यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. नितीन सांबरे, न्या. विभा कंकणवारडी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल बी. कोंडे देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात गवई यांनी कोल्हापूर खंडपीठासाठीही आपला पाठिंबा दर्शविला.
Leave a Reply