बीड : सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी दुपारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. डिझेलने भरलेल्या एका टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने टँकर पलटी झाला. अपघातानंतर काही क्षणातच टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.
या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग पोलिसांसह बीड ग्रामीण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
अपघात होताच टँकरचा चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखत वाहनातून उड्या घेतल्या. त्यामुळे जीवितहानी टळली असून दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मांजरसुंबा घाट हा उताराचा आणि वळणावळणाचा असल्याने या भागात वेगावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर चालकाचा वेग अधिक असल्याने त्याला नियंत्रण ठेवता आले नाही आणि टँकरला धडक बसली. टँकरमधील डिझेल उताराच्या दिशेने वाहू लागल्याने जवळच्या वस्तीपर्यंत आग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र पोलिस व प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा उशिरा पोहोचल्याचा आरोप होत असून यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे घाट परिसरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Leave a Reply