लातूर–मुंबई प्रवासात क्रांती! फडणवीसांची मोठी घोषणा : प्रवास वेळ थेट ११ तासांवरून ५ तासांवर

मराठवाड्याच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लातूरहून मुंबईला रस्तेमार्गे जाण्यासाठी लागणारा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४.५ ते ५ तासांत होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘NDTV मराठी’च्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि राज्यातील सुरू असलेल्या इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांमुळे हा बदल शक्य झाल्याचे सांगितले.

सध्या लातूर–मुंबई प्रवासासाठी मोठा वेळ खर्ची पडतो. मात्र शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अत्यंत जलद आणि सुकर होणार आहे. या मार्गाचे आरेखन पूर्ण झाले असून, त्यात अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. धाराशिवपर्यंत जुने आरेखन कायम ठेवले असले तरी धाराशिवनंतर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये मार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे चंदगडसारख्या आजवर ‘अनटॅप’ राहिलेल्या भागालाही थेट जोडणी मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की हा महामार्ग मराठवाडा, सोलापूर आणि सांगलीच्या दुष्काळग्रस्त भागांसाठी विकासाचा नवा मार्ग ठरेल. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तिपीठ महामार्गही उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना देणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. “लातूरचा नागरिक पाच तासांत मुंबईत पोहोचेल, या तत्त्वावर संपूर्ण मार्गाचे आरेखन तयार केले आहे,” असे फडणवीस म्हणाले.

पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशांची सशक्त कनेक्टिव्हिटी उभी करण्याच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया यावर्षातच पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल, असा सरकारचा दावा आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *