‘हुशार आणि प्रामाणिक राजकारणी’, उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून, यानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या जात असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडले आहेत.

उद्धव ठाकरे आपल्या लेखात काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत.” फडणवीस यांच्यासोबत २०१४ ते २०१९ या काळात आपण सत्तेत सहभागी असतानाचे अनुभव ठाकरे यांनी कथन केले. ते म्हणाले, “त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली.” उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना “हुशार आणि प्रामाणिक राजकारणी” असे संबोधले आहे.

आव्हान आणि यश

राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला असला तरी, फडणवीस यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला, असे ठाकरे यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती साधल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजनांमुळे त्यांची पक्षात विश्वासार्हता वाढली, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. “फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल,” असे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे, असेही ठाकरे यांनी आपल्या लेखात नमूद केले. शेवटी, “भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!” असे म्हणत ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *