भंडाऱ्यात ‘पुष्पा’सारखी सागवान तस्करी उघड; मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवर मोठं सिंडिकेट सक्रिय

भंडारा : लाल चंदन तस्करीवर आधारित ‘पुष्पा’ चित्रपटातील कथेसारखाच धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातून अवैधपणे सागवान वृक्षतोड करून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामार्गे नागपूर आणि मुंबईपर्यंत लाकडांची वाहतूक करणाऱ्या मोठ्या तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली असून, विभागाच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला जात आहे.

मध्यप्रदेशातील सागवान वृक्ष तोडून बनावट कागदपत्रे आणि चुकीचे हॅमर वापरून लाकूड वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही वाहतूक करणारा एक ट्रक भंडारा वन विभागाच्या जाळ्यात अडकला. तपासणीदरम्यान ट्रकमधील सागवान लाकडांवरील हॅमर आणि वाहतूक परवाना (TP) यामध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला.

ही कारवाई महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरील बपेरा वन नाक्यावर करण्यात आली. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी हा नाका महत्त्वाचा असून, याच मार्गावरून तस्करी सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष बाब म्हणजे १ डिसेंबरला ट्रक ताब्यात घेण्यात आला असतानाही वन गुन्हा तब्बल आठ दिवसांनी नोंदवण्यात आला. भारतीय वन कायद्यातील कलम ५२(२) नुसार २४ तासांत प्रकरण प्रथम श्रेणी न्यायालयात सादर करणं बंधनकारक असताना झालेली ही दिरंगाई गंभीर मानली जात आहे.

तपासात असे आढळून आलं की ट्रकमध्ये १९७ सागवान नगांची परवानगी असताना प्रत्यक्षात २१५ नगांची वाहतूक सुरू होती. त्यापैकी केवळ ५० नगांवर हॅमर होता, तर तब्बल १६५ नगांवर कोणताही हॅमर नव्हता. सुमारे ९ लाख रुपये किमतीचं १५.६४१ घनमीटर सागवान लाकूड वन विभागानं ताब्यात घेतलं आहे.

या संपूर्ण प्रकरणात मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातीलही काही वन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या सागवान तस्करीच्या सिंडिकेटची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *