हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आजेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार गणेश उत्तम तनपुरे (वय २३, रा. कापडसिंगी) यांचा जागीच मृत्यू झाला. २१ मार्च पहाटे पाचच्या सुमारास हा भयंकर अपघात घडला. गणेश आपल्या मामाच्या गावी आजी-आजोबांना घरी आणण्यासाठी निघाला होता. घरी लग्नविधीचा शुभकार्य सोहळा असल्याने उत्साहाचे वातावरण होते. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. गणेशच्या लग्नाला अवघे दोनच दिवस शिल्लक होते. घरभर लगबग आणि आनंदाचे वातावरण होते. आई-वडिलांचे डोळे आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी उत्साहाने चमकत होते. नातेवाईकांची गर्दी वाढू लागली होती. पण नियतीला हा आनंद सहन झाला नाही. आजी-आजोबांना आणण्यासाठी पहाटेच्या प्रहरी निघालेल्या गणेशचा अज्ञात वाहनाने घेतलेला जीव संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवून गेला. अपघात एवढा भीषण होता की, अज्ञात वाहनाने गणेशच्या मोटारसायकलला काही अंतर फरफटत नेले. त्यामुळे मोटरसायकलचा चुराडा झाला.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक निलेश लेनकुळे आणि इतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. गणेशच्या निधनाने कापडसिंगी गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. जो आनंद घरात साजरा होणार होता, तो दुःखात परिवर्तित झाला. लग्नाचे मांडव उभारले जाणार होते, मात्र आता त्या जागी अश्रूंची धार लागली आहे.
Leave a Reply