मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच जपानमध्ये 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला “अभिजात मराठी, अभिमान मराठी” हा आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने टोकियोतील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे हा ऐतिहासिक कार्यक्रम झाला.
या सोहळ्यास उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, उद्योग विभागाचे सचिव अनबलगन, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, जपानमधील मराठी अग्रणी योगेश पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय मराठी मंच जपान संपर्क प्रमुख निरंजन गाडगीळ यांनी सांभाळली होती. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सोहळा असल्याने हा क्षण ऐतिहासिक ठरल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा अभिमान, तिची अभिजात परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
कार्यक्रमात मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महत्त्वाचा संकल्प मांडण्यात आला. जगभरात ७५ मराठी मंडळे स्थापन करून मराठीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्धार या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमात टोकियो मराठी मंडळाने विशेष सहकार्य केले. जपानमधील मराठी समुदायासाठी हा सोहळा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला असून, मराठी भाषेच्या आंतरराष्ट्रीय ओळखीला नवी दिशा देणारा म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
“अभिजात मराठी, अभिमान मराठी” या सन्मान सोहळ्याने मराठीच्या अभिजाततेचा जागतिक स्तरावर गौरव केला असून, मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता जगभरात पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Leave a Reply