महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात प्रचंड विकासाची क्षमता असून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य सरकार सर्वंकष योजना आखणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ग्रामीण व सागरी भागातील लाखो कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसाय हा मुख्य उपजीविकेचा स्रोत आहे. या क्षेत्रात आर्थिक वृद्धीच्या अफाट संधी आहेत. त्यासाठी ‘व्हिजन मॅनेजमेंट युनिट’ स्थापन करून नियोजन व अंमलबजावणी अधिक कार्यक्षम करण्याचा विचार आहे. राज्यातील तज्ज्ञ व स्थानिक घटकांच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ची जलद गतीने अंमलबजावणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व बांधकाम क्षेत्रात विशेष कार्यक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात आला. महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला जाईल, तसेच या क्षेत्रातील प्रकल्पांना अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
बैठकीत मंत्र्यांनी पायाभूत सुविधा, प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना मांडल्या. राज्याची अर्थव्यवस्था ‘वन ट्रिलियन डॉलर्स’च्या दिशेने नेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे एकमत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
Leave a Reply