सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. आता दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये 40 आमदारांना घेऊन बंड करत पक्षावर दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला होता. तर असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडला होता. एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवारांनी देखील अशाच पद्धतीने पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यावेळी निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि याचिका दाखल केली होती.
उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण या प्रकरणी सप्टेंबर 2023 पासून सुनावणी झालेली नाही. दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी 7 मे रोजी कोर्टासमोर लागलेले आहे. त्यामुळे आता 7 मे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येते का? हे पाहणे महत्वाचे आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी आहे.शरद पवार गटाच्या याचिकेवर अनेक दिवसांपासून सुनावणी नव्हती. आता राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या तारखेला हे प्रकरण कोर्टासमोर लागले आहे.
Leave a Reply