मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही शुक्रवारी दुपारी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी आली असून तात्काळ सर्व न्यायमूर्ती, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. यामुळे सुरू असलेली सर्व सुनावणी थांबवण्यात आली असून न्यायालयीन कामकाज ठप्प झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल मिळताच इमारतीतून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध पथक (BDDS) आणि श्वानपथकाने परिसराची कसून तपासणी सुरू केली. “ईमेलमध्ये न्यायालयीन इमारतीत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. सर्व सुरक्षा उपाययोजना सुरू असून शोधमोहीम सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले असून गेल्या काही महिन्यांत मुंबईतील अनेक शाळा व नामांकित संस्था यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ही धमकी खरी आहे की खोटी, याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी सकाळीच दिल्ली उच्च न्यायालयालाही अशाच प्रकारच्या ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. त्या ईमेलमध्ये न्यायालयाच्या कक्षांमध्ये तीन बॉम्ब लपवले असल्याचा दावा करत सर्वांना दुपारी दोन वाजेपर्यंत इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तिथेही सुनावणी थांबवून इमारत रिकामी करण्यात आली व बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली. मुंबई व दिल्ली उच्च न्यायालयांना मिळालेल्या या धमक्या गंभीर मानून पोलिसांनी उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता शांत राहावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
Leave a Reply