मुंबई – मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हत्येच्या ८४ दिवसानंतर मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी सुपूर्द केला. त्यामुळे मंत्रिमंडळातील कोट्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची १ मंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी देण्यात आली होती. मात्र फडणवीस सरकारमध्ये दोन्ही नेत्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी इतर दोन नेत्याना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे अनिल पाटील किंवा संजय बनसोडे यांना रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळेल का, असा सवाल राजकीय वार्तुळात विचारला जात आहे.
मात्र या दोघांच्या आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.धनंजय मुंडे हे ओबीसी नेते होते. त्यामुळे त्यांच्याजागी ओबीसी नेताच असावा, असा एक मतप्रवाह आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते छगन भुजबळ यांनी याआधी संभाळलेले आहे. त्यामुळे या रेसमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. शिवाय ते माळी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना मंत्रीपदावरून डावलल्यानंतर ओबीसी त्यातली त्यात माळी समाज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. त्यामुळे ओबीसी समजाला समाधानी करण्याची ही अजित पवारांना संधी असणार आहे.
असे बोलले जाते की, छगन भुजबळ यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अनुकूल आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं देखील कळतंय. भुजबळांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणार आहे. तर ओबीसी समाजालाही प्रतिनिधीत्व मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा रोष कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच अधिवेशना होईल का याकडे इच्छुकांची नजर लागली आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आला आहे.
Leave a Reply