लंडन, न्यूयॉर्कनंतर मुंबईही ‘दोन विमानतळांचं शहर’; दोन लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा

नवी मुंबई | मुंबई आता लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस आणि इस्तंबूलप्रमाणे दोन विमानतळ असलेले शहर बनणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ६ ऑक्टोबर रोजी होणार असून, या प्रकल्पामुळे दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे.

विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी (रनवे) कार्यरत होणार असून, त्याची दरवर्षी २ कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता असेल. १९८५ साली या विमानतळाची कल्पना मांडण्यात आली होती आणि आता जवळपास चार दशकांनंतर हा प्रकल्प वास्तवात उतरणार आहे. हा विमानतळ चार टप्प्यांत पूर्ण होणार असून, २०३२ पर्यंत संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.

या विमानतळामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, कार्गो, आदानप्रदान आणि संशोधन या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत. तसेच फ्रक्वेन्सी अव्हिएशन आणि हवाई वाहतूक उद्योगाला चालना मिळणार आहे.

भारताचा विमान वाहतूक क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळ कार्यरत होते, ती संख्या २०२४ पर्यंत १५७ वर पोहोचली आहे. २०३० पर्यंत प्रवासी वाहतूक दुप्पट वाढून ९०० मिलियन प्रवासी आणि कार्गो वाहतूक तिप्पट वाढून ११ दशलक्ष टनांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

विमानतळाच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, विमानतळाशी जोडणाऱ्या रस्ते आणि मेट्रो मार्गांचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

या विमानतळामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जागतिक हवाई वाहतूक नकाशावर एक नवे, प्रभावशाली स्थान मिळणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *