अहमदाबाद: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारतीय विमान दुर्घटना तपास ब्युरो (AAIB) ने आपला प्राथमिक अहवाल (१५ पानांचा) जारी केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच दोन्ही इंजिने अचानक बंद पडल्याचे उघड झाले आहे. यामुळे विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
अहवालानुसार, सकाळी ८:०८ च्या सुमारास विमानाने १८० नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड (IAS) गाठली होती. यानंतर लगेचच, इंजिनांना इंधन पुरवणाऱ्या इंधन कट-ऑफ स्विचेस (Engine-1 आणि Engine-2 चे) एका सेकंदाच्या अंतराने ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीवर गेले. यामुळे इंधनाचा पुरवठा थांबला आणि दोन्ही इंजिनांची रोटेशन गती झपाट्याने कमी झाली.
या अपघाताचे गूढ वाढवणारी बाब कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मध्ये कैद झालेल्या संवादातून समोर आली आहे. अहवालानुसार, पायलट सुमीत सभरवाल यांनी सह-पायलट क्लाइव्ह कुंदर यांना, “तू इंजिनचे इंधन का बंद केलेस?” असा प्रश्न विचारला. त्यावर कुंदर यांनी, “मी काहीही केले नाही,” असे उत्तर दिले. दोन्ही पायलट इंजिन बंद केल्याचा इन्कार करत असल्याने, ही संभाव्य तांत्रिक बिघाडाची शक्यता बळावली आहे. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा (re-light) प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अयशस्वी ठरला. इंजिन-१ काही प्रमाणात पूर्ववत झाले, पण इंजिन-२ पूर्णपणे रिकव्हर होऊ शकले नाही. APU (Auxiliary Power Unit) देखील सक्रिय झाले, पण ते विमानाला स्थिर करू शकले नाही. अहवालात नमूद केल्यानुसार, सध्याच्या तपासात बोईंग ७८७-८ विमान किंवा इंजिन निर्मात्या कंपनीसाठी कोणतीही तांत्रिक धोक्याची सूचना (warning) जारी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
Leave a Reply