नवी दिल्ली: ११ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरो (AAIB) ने मंगळवारी आपला प्राथमिक अहवाल नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला, परंतु अपघातामागील तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे एआय-१७१ बोईंग ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले.
या भीषण अपघातात विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तसेच वसतिगृहातील काही व्यक्तींचाही यात बळी गेला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. ब्लॅक बॉक्समधील माहितीची तपासणी. अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (Crash Protection Module) मधील माहिती डाउनलोड करण्यात यश आले आहे. या माहितीची अचूकता तपासण्यासाठी ‘गोल्डन चॅसिस’ (Golden Chassis) नावाचा त्याच प्रकारचा दुसरा ब्लॅक बॉक्स वापरण्यात आला.
या दुर्घटनेच्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने AAIB ला पूर्ण सहकार्य केले आहे. या तपास पथकात भारतीय हवाई दल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि अमेरिकेतील नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) चे तज्ञ सहभागी आहेत. तसेच, बोईंग, जीई (GE) आणि हवाई वाहतूक नियंत्रण (Air Traffic Control) अधिकाऱ्यांनीही या तपासात सहकार्य केले आहे.
अपघाताचे नेमके कारण कधी समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply