एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांवर मोठा धोका : संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली : जगभर झपाट्याने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचा महिलांच्या रोजगारावर पुरुषांच्या तुलनेत अधिक विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या “जेंडर स्नॅपशॉट २०२५” या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगातील सुमारे २८ टक्के महिलांच्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात आहेत, तर पुरुषांच्या फक्त २१ टक्के नोकऱ्यांना हा धोका आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की भविष्यातील डिजिटल युग हे समानतेचे साधन ठरू शकते; मात्र त्यासाठी “लिंगाधारित डिजिटल दरी” त्वरित कमी करण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र महिला संस्था आणि आर्थिक व सामाजिक व्यवहार विभागाने सादर केलेल्या या अहवालात विद्यमान असमानता स्पष्ट केली आहे. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे प्रमाण केवळ २९ टक्के असून नेतृत्वाच्या पदांवर त्यांचा वाटा फक्त १४ टक्के आहे.

अहवालात इशारा देण्यात आला आहे की जग एका नव्या अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. जर भूतकाळातील चुका टाळल्या नाहीत, तर भविष्यात लिंग असमानता अधिकच गडद होऊ शकते. योग्य पद्धतीने वापर झाल्यास AI क्रांतीमुळे ३४ कोटी ३० लाख महिला व मुलींना फायदा होऊ शकतो, ३ कोटी लोकांना तीव्र दारिद्र्यातून मुक्तता मिळू शकते, ४ कोटींना अन्नसुरक्षा मिळू शकते आणि २०३० पर्यंत जागतिक वाढीत १.५ ट्रिलियन डॉलर्सची भर पडू शकते.

महिलांच्या रोजगारातील संधी व सहभाग वाढावा यासाठी अहवालात महिलांच्या डिजिटल व तांत्रिक कौशल्यात गुंतवणूक करण्याचे, रोजगारातील संक्रमण सोपे करण्याचे आणि लिंग-संवेदनशील श्रम व सामाजिक संरक्षण धोरणे राबवण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा डिजिटल क्रांती अर्थव्यवस्था व समाज बदलत असताना महिलांना मागे टाकण्याचा धोका असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *