दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवातील भव्य कार्यक्रमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची उपस्थिती विशेष ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ऐश्वर्याने दिलेला मानवतेचा संदेश आणि तिच्या आदरयुक्त वर्तनाने उपस्थितांची मनं जिंकली. मंचावर आल्यानंतर ऐश्वर्याने सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करून आदर व्यक्त केला. पीएम मोदींनीही हात जोडत प्रत्युत्तर देत तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. हा क्षण सभागृहात दाद मिळवताच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे.
यानंतर ऐश्वर्या रायने धर्म, जात आणि मानवतेविषयी छोटं पण प्रभावी भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधले. “इथं फक्त एकच जात आहे, मानवतेची जात… एकच धर्म आहे, प्रेमाचा धर्म… एकच भाषा आहे, हृदयाची… आणि एकच ईश्वर आहे, जो सर्वव्यापी आहे. साईराम… जय हिंद,” अशा शब्दांत तिने सार्वत्रिक प्रेमाचा संदेश दिला. तिच्या या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींसह उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
ऐश्वर्या राय आणि सत्य साईबाबा यांच्यातील जुना संबंधही या प्रसंगी उल्लेखनीय ठरला. तिचे पालक सत्य साईं बाबांचे निष्ठावान भक्त असून ऐश्वर्यानेदेखील बालविकास व धर्मशास्त्राशी संबंधित उपक्रमांमध्ये शिक्षण घेतले आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतरही ती विशेषतः पुट्टपर्थीत जाऊन साईबाबांच्या आशीर्वादासाठी पोहोचली होती.
शताब्दी सोहळ्यातील तिची विनम्रता, देहबोली आणि सार्वत्रिक प्रेमाचा संदेश यामुळे सोशल मीडियावर ऐश्वर्याचे भरभरून कौतुक होत असून अनेकांनी तिने दिलेला मानवतेचा संदेश आजच्या काळात विशेष महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


Leave a Reply