अहिल्यानगर : शिर्डी साईबाबा आणि साईबाबा संस्थानविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे दिल्लीचे अजय गौतम यांनी अखेर राहाता येथील न्यायालयात माफी मागितली आहे. त्यांनी न्यायालयासमोर हजर राहून आपली चूक मान्य करत म्हटले, “साईबाबा व साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे गैरसमज दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.”
अजय गौतम यांनी सांगितले की, “मी प्रथमच १९९५ साली मुंबईहून बसने शिर्डीत आलो होतो. तेव्हाच मला साईबाबांचा अनुभव आला होता.” २०२३ मध्ये साईबाबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने राहाता न्यायालयात त्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. त्यानंतर आज त्यांनी न्यायालयात माफीनामा सादर करून साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठीही उपस्थिती दर्शवली.
गौतम यांनी पुढे सांगितले की, “२०१४ साली शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत धर्म संसदेत साईबाबांविषयी काही प्रस्ताव झाला होता. मात्र आता मला साईबाबांचा आलेला अनुभव मी विद्यमान शंकराचार्यांना सांगणार आहे.” त्यांनी सोशल मीडियावरील साईबाबांविषयी चालणारा अपप्रचार थांबवण्याची जबाबदारी घेणार असल्याचंही स्पष्ट केलं.
दरम्यान, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काही संघटनांनी मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या होत्या. देशभरातील साईभक्तांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला होता. आता अजय गौतम यांच्या माफीनाम्यानंतर शिर्डीत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply