मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाने मोठा विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी नवीन शेट्टी यांचा ४८ मतांनी पराभव केला. सचिवपदी उन्मेष खानविलकर यांनी २२७ मतांसह विजय मिळवत शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले २२८ मतांनी विजयी झाले, तर खजिनदार पदावर अरमान मलिक यांनी २३७ मतांसह विजय मिळवला.
यापूर्वीच अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. एकूण ३६२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ॲपेक्स कौन्सिलमधील नऊ जागांवरही अजिंक्य नाईक गटाचे वर्चस्व दिसून आले. या निवडणुकीत कदम विघ्नेश (२४२), नदीम मेमन (१९८), मिलिंद नार्वेकर (२४२), भूषण पाटील (२०८), विकास रेपाळे (१८५), सूरज समत (२४६), सावंत नील (१७८), संदीप विचारे (२४७) आणि प्रमोद यादव (१८६) हे विजयी ठरले.
नव्या कार्यकारिणीत अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यांनी विजय मिळवला असून, आशिष शेलार गटाचे ४ सदस्य निवडून आले. निकालानंतर अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “हा विजय आमच्या मैदान क्लब्स, सचिव आणि सर्व क्रिकेटप्रेमींच्या परिश्रमांचा परिणाम आहे. हा मुंबईच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या मजबूत पाठिंब्यामुळेच हा यशाचा प्रवास शक्य झाला. तसेच आशिष शेलार यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार.”
मुंबई क्रिकेटमधील आगामी काळात ही नवी कार्यकारिणी कोणते बदल आणि सुधारणा घेऊन येते, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply