मुंबई : दारूच्या दुकानांमुळे सोसायटी परिसरात निर्माण होणाऱ्या त्रासावर आता अंकुश बसणार आहे. दारूच्या दुकानांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे अनेकदा नागरिक त्रस्त होतात. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. आता कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यात दारूचे दुकान सुरू करण्यासाठी संबंधित सोसायटीची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे अनिवार्य असणार आहे. याबाबत विधानसभेत आज चर्चा झाली. एका आमदाराने बीयर शॉपमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले. अध्यक्ष महोदय, बीयर शॉपमध्ये दारू खरेदी करणारे काही लोक दुकानाबाहेरच दारू पितात आणि परिसरात गोंधळ घालतात. महिलांना, मुलींना यामुळे त्रास होतो. अनेकदा वादविवाद आणि भांडणेही होतात. त्यामुळे यावर त्वरित कारवाई होईल का? असा सवाल आमदाराने विधानसभेत उपस्थित केला. त्यावर अजित पवारांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यांमध्ये कशाप्रकारची दुकाने असावेत हा शेवटी त्यांचा अधिकार आहे. म्हणून सोसायटीची एनओसी असेल तरंच अशा भागात दुकाने स्थलांतरीत देण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. लवकरच त्याबाबत नियमात तरतूद केली जाईल, जेणेकरुन या ज्या अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाली लागेल”, असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केल्यामुळे अशाप्रकारच्या अडचणीला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यातच दारुची दुकानं राहिली तर अनेकजण त्यामुळे व्यसनाधीन होण्याचा धोका जास्त आहे.

दारु दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची NOC घ्यावी लागणार; अजित पवारांची विधानसभेत महत्वाची घोषणा
•
Please follow and like us:
Leave a Reply