राजकीय विभाजनानंतर दोन वर्षांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अधिकृतरित्या निमंत्रण देणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी हे निमंत्रण देण्यात येणार आहे. विभाजनानंतर अजित पवार यांनी पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह आपल्या ताब्यात घेतले, तर शरद पवार आता विरोधी पक्षात असून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)’चे नेतृत्व करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, “आपण ३ मे रोजी महाराष्ट्राचे सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार आहोत. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे सध्या परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे, तरीही त्यांनाही निमंत्रण दिले जाईल. आमचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल स्वतः शरद पवार यांना भेटून त्यांना निमंत्रण देतील.”
‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सव १ ते ४ मे दरम्यान आयोजित केला जाणार असून, महाराष्ट्राच्या स्थापनेच्या ६५ वर्षांच्या निमित्ताने हा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवासाठी पाच स्वतंत्र दालने उभारण्यात येणार असून, त्यापैकी एक दालन महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना समर्पित असेल, ज्यामध्ये त्यांचा राज्याच्या विकासात दिलेला योगदान अधोरेखित केला जाणार आहे.सुनील तटकरे म्हणाले, “१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सलग पाच दिवस विविध कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. यंदा आपण त्याच परंपरेचे पुनरुज्जीवन करत आहोत.”
शरद पवारांच्या सहभागाबाबत विचारले असता, तटकरे म्हणाले, “शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून त्यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले आहे. त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष कसे करता येईल? आम्ही त्यांना निमंत्रण देणार असून, सहभागी होण्याचा निर्णय ते स्वतः घेतील.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटातील सूत्रांनी स्पष्ट केले की, अजून शरद पवार यांना कोणतेही अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही. “हा कार्यक्रम सरकारचा नसून पक्षाचा आहे. आणि जे काही पवारांमध्ये घडले, त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंचावर जाण्याची शक्यता कमीच आहे,” असे त्या गटातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.गेल्या दोन वर्षांत अजित आणि शरद पवार हे एकत्र केवळ शासकीय बैठका किंवा कौटुंबिक समारंभांमध्येच दिसून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोघांनीही राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणतीही टीका-टिप्पणी टाळली आहे.
Leave a Reply