नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. “पालकमंत्री झालात म्हणजे त्या जिल्ह्यात हजेरी लावायलाच हवी. अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत फिरा. जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधा. अन्यथा खुर्ची सोडा,” असा कठोर इशारा त्यांनी चिंतन शिबिरात दिला.
नागपूरात शुक्रवारी पवार गटाचे चिंतन शिबिर पार पडले. सकाळी ९:३० वाजता सुरू झालेल्या शिबिराला अनेक मंत्री व आमदार उशिरा पोहोचले. यावर अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “वेळेचे महत्त्व कळायला हवे. पुढे उशिरा आले तर दार बंद करून आत असलेल्यांनाच सहभाग देता येईल,” असे त्यांनी सुनावले.
अजित पवार यांनी मंत्र्यांना कार्यपद्धतीचे निर्देश दिले. “आठवड्यात तीन दिवस मुंबईसाठी, एक दिवस मतदारसंघासाठी आणि तीन दिवस पक्षाच्या कामासाठी द्यावे लागतील. काही मंत्री काम न करता फक्त प्रसिद्धी घेतात, असे चालणार नाही. जनतेशी सतत संपर्क ठेवा,” असे ते म्हणाले. तसेच दर तीन महिन्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जनसभा आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
शिबिरात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी मंत्र्यांना जनतेसाठी सक्रिय राहण्याचा सल्ला देत “हा प्रवास खडतर असला तरी यशस्वी करण्याची ताकद आपल्यात आहे” असे सांगितले. एकूणच, अजित पवारांच्या कडक शब्दांमुळे मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या ठळकपणे समोर आल्या असून पक्षातील शिस्तीला नवा संदेश मिळाला आहे.
Leave a Reply