मुंबई: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव” पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना तर महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे यांना आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २ जुलै, २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
परिषदेचे एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पत्रकारितेत भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरवण्यात येते. यावर्षी देखील १० पत्रकारांना सन्मानित केले जाणार आहे.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप
गेली ६५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत निष्ठेने कार्यरत असलेले ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना “बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी यांसारख्या दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.
इतर पुरस्कारार्थी आणि पुरस्कार
या सोहळ्यात अन्य मान्यवर पत्रकारांनाही विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यांची नावे आणि पुरस्कार खालीलप्रमाणे:
* आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार: ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे
* शशिकांत सांडभोर पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक मीडिया): मुंबई तकचे अभिजित कारंडे
* स्व. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार: ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर
* भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार: अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील
* नागोजीराव दुधगावकर पुरस्कार: बीड येथील सुराज्य दैनिकाचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर
* दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार: दैनिक हेराल्डचे संपादक दिनेश केळुसकर
* सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार (महिला पत्रकार): सिंधुदुर्ग येथील पत्रकार सीमा मराठे
* स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार (यावर्षीपासून सुरू): ॲग्रोवनचे पत्रकार बाळासाहेब पाटील
* संतोष पवार स्मृती पुरस्कार (प्रसिद्धी प्रतिनिधींसाठी): पुणे येथील पत्रकार भरत निगडे
या पुरस्कार सोहळ्यात दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि कलाकार भरत जाधव यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै, २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होईल. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके आणि मुंबई शाखा अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले आहे.
Leave a Reply