कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज मोठा निर्णय झाला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वीच या प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या खटल्यातील सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे.
20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. याच काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी या प्रकरणाचा संबंध असल्याचंही पुढे आलं. तपास यंत्रणांनी दीर्घकाळ चौकशी करून एकूण 12 संशयितांना अटक केली होती.
या प्रकरणातील तावडे, काळे आणि कळसकर यांना जामीन मिळालेला नव्हता आणि ते गेल्या साडे नऊ वर्षांपासून तुरुंगात होते. त्यांच्या जामिनाच्या अर्जावर आज कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला.
दरम्यान, या निर्णयानंतर सनातन संस्थाने प्रतिक्रिया दिली आहे. “निरपराध हिंदुत्वनिष्ठांना साडे नऊ वर्षे तुरुंगात ठेवले गेले. आता या काळाची भरपाई कोण करणार?” असा सवाल संस्थेने उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे पानसरे हत्याप्रकरणात पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासावर पुन्हा एकदा राज्याचे लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. या खटल्याचा निकाल येत्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे.


Leave a Reply