अहमदाबाद, : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ (Air India Boeing 787-8) विमानाला आज दुपारी भीषण अपघात होऊन, विमानात असलेल्या सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पायलट, १० क्रू सदस्य आणि २३० प्रवाशांचा समावेश आहे. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान मेघानी नगर परिसरातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २.४० वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Sardar Vallabhbhai Patel International Airport) उड्डाण केल्यानंतर ९ ते १५ मिनिटांतच विमान कोसळले. विमानाने सुमारे ८२५ फूट उंची गाठल्यानंतर ते अचानक खाली आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, दोन्ही इंजिन निकामी झाल्याचा किंवा पक्ष्यांच्या धडकेमुळे तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच अपघातामागील खरे कारण समोर येईल. विमान हॉस्टेलवर आदळल्याने भीषण आग लागली आणि इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. ज्यावेळी विमान कोसळले, त्यावेळी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्याही जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी तात्काळ एनडीआरएफ (NDRF) च्या ६ टीम्स, बीएसएफ (BSF) च्या २ टीम्स, सैन्य, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी बचावकार्यात सहभागी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आणि घटनेच्या सखोल चौकशीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे. अहमदाबाद विमानतळावरील कामकाज काही काळ थांबवण्यात आले होते, परंतु आता ते पुन्हा सुरू झाले आहे.


Leave a Reply