पुणे – पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणींना पुण्यात आणून त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर येथील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी तीन तरुणींनी मदत केली होती. या प्रकरणी, कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट नसताना या तरुणींच्या घरी घुसून त्यांची झडती घेतल्याचा आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचा आरोप आहे.
पीडित तरुणींचा आरोप
* जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण: तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
* विनयभंग: पोलिसांनी रिमांड रुममध्ये पाच तास छळ केला आणि विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
* घरात घुसून झडती: पोलिसांनी वॉरंटशिवाय घरात घुसून बाथरुम आणि बेडरुममध्ये तपासणी केली, तसेच त्यांच्या इनरवेअरचीही तपासणी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
* धमकी: पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी दिली, असा आरोपही तरुणींनी केला आहे.
या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर मारहाणीचे थेट आरोप करण्यात आले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी केली तातडीने कारवाईची मागणी
या घटनेनंतर, पीडित तरुणींनी पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या चर्चेत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आणि सुजात आंबेडकर यांसारखे नेतेही सहभागी झाले होते. मात्र, अनेक तास चर्चा होऊनही पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला. ‘तात्काळ एफआयआर नोंदवा, नाहीतर मी आंदोलनाला बसायला सांगेन,’ असा इशारा त्यांनी दिला. कोणत्याही वॉरंटशिवाय घरात घुसण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे त्यांनी बजावले. ‘पोलिसांकडून एफआयआर नोंदवायला इतका विरोध का?’ असा प्रश्न विचारत, एफआयआर नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रकाश आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली असून, आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply