कळंब (जि. धाराशिव) पोलिसांच्या कथित मारहाणीत मुरूड तालुक्यातील ढोराळा येथील भैरू येडबा चौधरी (वय ४०) या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी (७ जुलै २०२५) मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी लावून धरली. मिळालेल्या माहितीनुसार, भैरू चौधरी यांना शुक्रवारी (४ जुलै २०२५) कळंब पोलिसांनी कौटुंबिक वादातून ताब्यात घेतले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार, पोलिसांनी त्यांना ठाण्यात मारहाण केली आणि नंतर सोडून दिले.
रविवारी (६ जुलै २०२५) सकाळी ते घरी परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. मुरूड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र, घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. रविवारी संध्याकाळी त्यांना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी कळंब पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुरुवातीला गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास त्यांनी नकार दिला. काही नातेवाईक शिराढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्यात गेले, मात्र तिथे गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी सर्व नातेवाईक धाराशिवच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. तोपर्यंत मुरूड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून बारा तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता.मुरूडमध्ये पहिल्यांदाच ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन मुरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच ‘इन कॅमेरा’ (In Camera) शवविच्छेदनाची तात्पुरती सोय करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर पवार, मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे हे उपस्थित होते. नातेवाईकांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांकडूनही केली जात आहे.
Leave a Reply