मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुरुवारी सभागृहात जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद इतक्या टोकाला गेला की आमदार सचिन अहिर यांनी अंबादास दानवे यांना अडवलं आणि सभापतींना सभागृहाचं काम थांबवावं लागलं. गुरुवारी विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला. दिशा सालियान केसवर सभागृहात चर्चा झाल्यानंतर उबठाचे आमदार अनिल परब यांनी सभागृह डोक्यावर घेतलं. सत्ताधारी आमदारांना चांगलंच सुनावलं. यादरम्यान चित्रा वाघ आणि त्यांच्यात चांगलाच वाद पाहायला मिळाला. त्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यात बाचाबाची झाली.
नेमकं काय झालं होतं?
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत? मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण) चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का? असा प्रश्न दानवे यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन मध्येच बोलले, त्यानंतर दानवेंचा पारा चढला. मी तुमच्याशी बोलत नाही, मला बोलूद्या. सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नाहीतर मी जातो, त्यानाच बोलूद्या म्हणत दानवे संतापले. ही हमरी-तुमरी एवढी वाढली की अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
Leave a Reply