आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाई शहराला ‘कवितेचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी बीड दौऱ्यावर केली. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव ठरणार आहे. यापूर्वी केशवसुतांचे मालगुंड व कुसुमाग्रजांचे शिरवाडे या गावांना कवितेचे गाव म्हणून मान्यता देण्यात आली आहे.बीडमध्ये साहित्यिक व साहित्यप्रेमींशी संवाद साधताना मंत्री सामंत म्हणाले, आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठीतील पहिली ओवी लिहिली असून, त्यांचं अंबाजोगाई हे जन्मस्थान आहे, त्यामुळे या गावाला कवितेचे गाव म्हणून घोषित करण्यात येईल.
या उपक्रमाअंतर्गत अंबाजोगाईमधील ३५ ठिकाणी कवितासंग्रह व साहित्यप्रेमींसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासोबतच पर्यटकांसाठी निवास व भोजनाचीही व्यवस्था केली जाणार आहे.मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाईल. प्रास्ताविक टप्प्यात खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, कवी मुकुंदराज समाधिस्थळ, शासकीय महाविद्यालय व अपर जिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी ‘कवितेचे गाव’ दालने सुरू केली जातील. तसेच मुकुंदराज समाधिस्थळाच्या विकासासाठी वन विभागासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या संवाद सत्राला दीपा क्षीरसागर, विवेक निरगणे, संजय पाटील देवळाणकर, सतीश साळुंके, आनंद कराड यांसारखे साहित्यिक उपस्थित होते.
बाल, महिला व युवा साहित्य संमेलनांचे आयोजन
मंत्री सामंत यांनी यावेळी माहिती दिली की, राज्यात लवकरच बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहेत.बीड जिल्ह्यात अशा कोणत्यातरी संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी साहित्यिकांनी केली.
‘कवितेचे गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तातडीने आदेश जारी केले असून, अंबाजोगाईचे अपर जिल्हाधिकारी यांना समन्वय अधिकारी तर उपविभागीय अधिकाऱ्यांना सहसमन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ही प्रक्रिया आता गतीमान झाली आहे.
Leave a Reply