राज्यातील निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची जोरदार लगबग; काँग्रेसला अमरावतीत मोठा धक्का

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आगामी दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, तर महापालिका निवडणुकाही लवकरच होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात पक्षांतरांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. महायुतीने तब्बल आघाडी घेत सत्ता टिकवून ठेवली. यानंतर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज आणि पदाधिकारी महायुतीत दाखल झाले. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक फटका बसला असून त्यांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते अन्य पक्षात गेल्याचं चित्र आहे.

दरम्यान आता अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या गोटातील माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख, सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोर ही मोठी अडचण निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे भाजपमध्येही इनकमिंगचा ओघ वाढला असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसत आहे. भाजपकडून होत असलेल्या या घडामोडींमुळे महायुतीत नाराजीचे सूर उमटले आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही घातल्याने महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *