सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ३ एप्रिल रोजी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी बीड येथे शिक्षक मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना चक्कर आली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण ही भेट घेतल्याचे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. “मी आणि मनोजदादा यापूर्वी प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतो, फक्त फोनवर संवाद झाला होता. मात्र, दादांची तब्येत ठीक आहे का, याची खात्री करायची होती. चांगल्या माणसांना भेटायला कधीच अडचण येत नाही,” असे त्या म्हणाल्या.
या भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “बीडच्या कार्यक्रमात थोडा त्रास जाणवला होता. त्यानंतर अंजली ताई मला भेटायला आल्या. त्यांचा सामाजिक कार्याचा मोठा आवाका असूनही त्या येथे आल्या, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. यात वेगळे काही नाही.” या भेटीदरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही चर्चा झाली. दमानिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली. “या प्रकरणातील चार्जशीटमध्ये अनेक बाबी अपूर्ण वाटत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचे स्टेटमेंट संपूर्ण नाही. खून झाल्यानंतर तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने लपला, याचा उल्लेख नाही. पोलिसांनी इतक्या महत्त्वाच्या बाबींची चौकशी का केली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दमानिया यांनी पुढे आरोप करत म्हटले, “व्हिडिओत राजेश पाटील आणि प्रशांत महाजन स्पष्ट दिसत आहेत, तरीही त्यांना सहआरोपी करण्यात आलेले नाही. तसेच, शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे आणि डॉक्टर वायबसे यांची नावे चार्जशीटमध्ये समाविष्ट नाहीत. जर त्यांची नावे आरोपपत्रात आली, तर या प्रकरणाची साखळी थेट धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचेल, म्हणूनच ती मुद्दामहून वगळण्यात आली आहेत.” या प्रकरणाच्या पुढील तपास आणि कायदेशीर मार्गांबाबतही या भेटीत चर्चा झाली. “दहा लोक या प्रकरणात सामील आहेत. त्यांना सहआरोपी म्हणून समाविष्ट करणे आवश्यक आहे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले.
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
Leave a Reply