मुंबई : अॅप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभर एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. या बंदचे आवाहन भारतीय गिग कामगार मंचाने केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
चालकांचे म्हणणे आहे की, इंधन व देखभाल खर्चात मोठी वाढ झाली असताना उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर, सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव, तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य यंत्रणा नसणे, आणि अॅप कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने चालकांचे खाते निलंबित करणे, या सर्व समस्यांमुळे चालक वर्ग त्रस्त आहे. त्यामुळे पारदर्शक भाडे संरचना, स्थिर वेतन, विमा संरक्षण आणि शासकीय नियमनाखाली अॅप कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परिवहन विभागाने अद्याप या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चालक संघटनांनी केला आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री कार्यालयात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत काही तात्पुरते निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र कोणताही ठोस निकाल लागलेला नाही, असे भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव भिरसागर यांनी सांगितले.
राज्य परिवहन विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अॅग्रीगेटर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने त्यांच्या अडचणींना गांभीर्याने घेतले नाही, तर पुढील काळात अधिक मोठे आंदोलन करण्यात येईल.
देशभरातील विविध विषयांवर ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या बंदला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चालक संघटनांचे म्हणणे आहे की, हा बंद शांततापूर्ण मार्गाने होणार असला तरी सरकारने याची दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.
Leave a Reply