मीरा रोड: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच मीरा रोड येथे कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेल्या वादातून एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाला मारहाण करण्यात आली. त्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी सकाळी घडली. ठाकूर मॉलजवळच्या डीबी ओझोन इमारतीमध्ये राहणारे महेंद्र पटेल (८६) सकाळी दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी बाजूच्या इमारतीमधील ५६ वर्षीय आशा व्यास इमारतीच्या सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकत होत्या. पटेल यांनी त्यांना दाणे टाकण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि आशा व्यास यांनी पटेल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा गोंधळ ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमला (४६) खाली आली आणि तिने आशा व्यास यांना वडिलांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले.
त्यानंतर आशा व्यास यांनी प्रेमलालाही शिवीगाळ केली. त्याचवेळी आशा व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री हा इतर दोन अनोळखी व्यक्तींसोबत खाली आला. सोमेशने प्रेमलाला लोखंडी रॉडने मारले, तर एका अनोळखी व्यक्तीने तिचा गळा दाबून हाताने मारहाण केली.
या घटनेनंतर, काशीमीरा पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री आणि अन्य दोन अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply