नागपूरच्या अभ्यंकर नगर परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी फटकारल्याने त्याचा इगो दुखावला. परिणामी, या तरुणाने आपल्या मित्रांसह रागाच्या भरात वाहनांची तोडफोड करत परिसरात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात बजाज नगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा तरुणांना अटक केली असून, त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर येथील रहिवासी आणि पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारा शाश्वत उदय दरवे हा होलिका दहनाच्या रात्री आपल्या अल्पवयीन मैत्रिणीला सोडण्यासाठी अभ्यंकर नगरमध्ये आला होता. यावेळी तो अत्यंत वेगाने आणि रॅश ड्रायव्हिंग करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला जाब विचारला आणि मैत्रिणीसमोरच त्याला फटकारलं. त्या वेळी दरवेनं काही प्रतिक्रिया दिली नाही आणि तेथून निघून गेला.
राग मनात ठेवून परतला आणि गोंधळ घातला
पण मैत्रिणीसमोर फटकारल्याचा राग मनात धरून दरवे रात्री उशिरा आपल्या पाच मित्रांसह परत आला. ते सर्वजण तीन दुचाकींवर आले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांवर दगडफेक करत त्यांच्या काचा फोडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. बजाज नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली.
अटक करण्यात आलेले आरोपी शाश्वत उदय दरवे,लक्ष चंदेल,उज्ज्वल गिरी ,उदय धनविजय ,अमन लामसुंगे ,एका अल्पवयीन मुलाला. या सर्वांवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, अवैध शर्यतीसाठी वाहन चालवणे, आणि वाहनांची तोडफोड यासारख्या गंभीर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी शिक्षित घरातील मुलाने केवळ इगोच्या भरात असं कृत्य करणं दुर्दैवी आहे, असा खेद व्यक्त केला आहे.
मैत्रिणीसमोर फटकारल्याने रागावलेला दरवे आणि त्याचे मित्र हा प्रकार घडवून आणतील, याची कल्पनाही स्थानिकांना नव्हती. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, आम्ही त्याच्या हितासाठीच फटकारलं होतं, कारण रॅश ड्रायव्हिंगमुळे तो स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत होता.पण या रागाच्या भरात वाहनांची तोडफोड करून त्याने परिसरात गोंधळ उडवून दिला. त्यामुळे, शिकल्यासवरलेल्या मुलांमध्येही अविचाराने गुंडप्रवृत्ती वाढत असल्याचे एका नागरिकांनी म्हटले.
Leave a Reply