वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. भाजपच्या मित्रपक्षांतील अनेक मुस्लिम नेते नाराज होत असतानाच काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ मुस्लिम नेते आणि माजी आमदार युसूफ अब्राहानी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अब्राहानी यांनी आपला राजीनामा थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला असून, त्याची प्रत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि खासदार गायकवाड यांनाही दिली आहे.
राजीनाम्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे आणि त्यास पक्षातीलच काही नेते जबाबदार आहेत. राहुल गांधींना याविषयी सविस्तर माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मी खूपच निराश झालो आहे. युसूफ अब्राहानी हे व्यवसायाने वकील असून विविध मुस्लिम संघटनांशी ते निगडीत आहेत. सध्या ते इस्लाम जिमखाना या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री दर्जाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. अब्राहानींच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली असून, येत्या काळात आणखी काही नेते पक्ष सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply