मुंबईत राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा (BARC) बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. त्याच्या निवासस्थानावर छापा टाकल्यावर तपास अधिकाऱ्यांना थेट ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अख्तर हुसेन स्वतःला BARC मधील वैज्ञानिक असल्याचे भासवत होता. पोलिसांनी मिळवलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या घरात सापडलेल्या नकाशांचा संबंध अणु संशोधनाशी असण्याची शक्यता तपासली जात आहे. हे नकाशे त्याच्याकडे कसे आले, त्यांचा स्रोत काय आणि उद्देश काय होता, याची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की, या माध्यमातून भाभा अणु संशोधन केंद्रात घातपाताचा कट रचला गेला असावा.
NIA, IB आणि मुंबई गुन्हे शाखेचा एकत्रित तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारली जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, पुढील काही दिवसांत अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे देशातील अणु तंत्रज्ञान आणि संरक्षण संशोधनाचं प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास वेगाने सुरू आहे.


Leave a Reply