पुण्यात एटीएसची कारवाई: उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, अल-कायदाशी संबंधांचा तपास

पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहत होता. हंगरगेकरकडे लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर, तसेच अल-कायदा ‘इन्स्पायर’ मासिकातील बॉम्ब तयार करण्याची आणि एके-४७ रायफल वापरण्याची माहिती असलेले साहित्य आढळून आले.

एटीएसच्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित माहिती आढळल्याने त्याला अटक करण्यात आली. हे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या उपकरणांचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून, आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून सध्या कल्याणीनगरमधील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो विवाहित असून दोन मुलांचा पिता आहे. न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एटीएस त्याच्या मित्राचीही चौकशी करत आहे. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर उपकरणांची तपासणी सुरू असून, तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

या कारवाईपूर्वी एटीएसने आयसिस मॉड्यूलशी संबंधित काही संशयितांवरही लक्ष ठेवले होते. या प्रकरणातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सायबर आणि धार्मिक कट्टरतेच्या धोक्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *