मुंबई: महाराष्ट्रात आमदारांच्या बनावट लेटरहेड, सह्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या आवाजाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटी १० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी विधानपरिषदेत माहितीच्या मुद्द्याद्वारे ही बाब निदर्शनास आणली आणि आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्यांच्या परवानगीने वर्ग केला जात आहे की नाही हे तपासण्यासाठी शासनाने यंत्रणा उभारण्याची मागणी केली. लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील एका अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी लाड यांना फोन करून बीड जिल्ह्यासाठी काही निधी दिला आहे का, अशी विचारणा केली. लाड यांनी असा कोणताही निधी दिला नसल्याचे सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
यापूर्वीही भाजप आमदार श्रीकांत भारतीय आणि सभापती होण्यापूर्वी प्रा. राम शिंदे यांनाही असाच अनुभव आल्याचे लाड यांनी सभागृहात सांगितले. राम शिंदे यांच्या लेटरहेडवर ५० लाखांची कामे सुचवण्यात आली होती, मात्र त्यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. श्रीकांत भारतीय यांच्या बाबतीतही १० लाखांची कामे सुचवण्यात आली होती, परंतु त्यांच्या सतर्कतेमुळे ती थांबवण्यात आली.
प्रसाद लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिली आहे. तपासादरम्यान प्रशांत लांडे, नीलेश वाघमोडे, सचिन बनकर या चार जणांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी एक बीड जिल्ह्यातील सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. आमदारांच्या लेटरहेडवरील मोबाईल क्रमांक चुकीचा असल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार गंभीर असून, सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकतो.
Leave a Reply