बाबा सिद्दीकींच्या मोबाईल नंबरवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; वांद्रे पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु

मुंबई: दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या एका मोबाईल नंबरचा ताबा घेण्याचा एका अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केला आहे. हा नंबर कुटुंबाच्या रिअल इस्टेट आणि व्यावसायिक कंपन्यांशी जोडलेला असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. या प्रकरणी बाबा सिद्दीकींच्या कन्या डॉ. अर्शिया सिद्दीकी (३९) यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यानुसार १६ जून रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने बाबा सिद्दीकींच्या पत्नी, शहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक बनावट ईमेल आयडी तयार केला. या बनावट ईमेल आयडीचा वापर करून, व्होडाफोन कंपनीला संपर्क साधून, मोबाईल नंबरचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (authorized signatory) बनण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, फसवणूक करणाऱ्याने शहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक आणि कंपनीचे लेटर हेड देखील मिळवले होते. हे सर्व तपशील बनावट ईमेल आयडीद्वारे मोबाईल कंपनीला सादर करण्यात आले, जेणेकरून सिद्दीकींच्या नंबरवर नवीन अधिकृत स्वाक्षरीकर्ता म्हणून आपले नाव नोंदवता येईल.

डॉ. अर्शिया सिद्दीकी या वांद्रे पश्चिमेकडील रहिवासी असून, त्या ‘फ्लेवर फूड व्हेंचर’ नावाचा खाद्यपदार्थ व्यवसाय चालवतात. तर, बाबा सिद्दीकींची पत्नी शहझीन सिद्दीकी यांची ‘झियर्स बिझनेस इंडिया एलएलपी’ नावाची रिअल इस्टेट कंपनी आहे. बाबा सिद्दीकींचा मोबाईल नंबर या दोन्ही कंपन्यांशी संबंधित आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आठवणीसाठी तो सक्रिय ठेवला आहे. या बनावट ईमेलमध्ये मिशेल शर्मा, तरुण कुमार, अविनाश अरोरा आणि सुमित शर्मा अशी काही नावे आढळली आहेत. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू केला आहे. अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *