नवी दिल्ली | देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज एक धक्कादायक प्रकार घडला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान त्या वकिलाने अचानक सरन्यायाधीशांच्या जवळ जाऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्या वकिलाला जागेवरच अडवले आणि कोर्टात संभाव्य अनर्थ टळला.
घटनेनंतर काही काळ सुप्रीम कोर्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित वकील आणि न्यायालयीन कर्मचारी यांनाही या घटनेचा धक्का बसला. हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला ताबडतोब कोर्टातून बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे म्हणत हा प्रकार केला. त्याच्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे न्यायालयीन शिस्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुप्रीम कोर्ट सुरक्षा यंत्रणांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणत परिसर सुरक्षित केला.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायव्यवस्थेतील उच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत पावले उचलण्याची मागणी आता होत आहे.
या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात आणि कायदा क्षेत्रात संताप व्यक्त होत असून, वकिलांकडूनच असा प्रकार घडल्याने सर्वच स्तरांतून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Leave a Reply