महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. सोमवारी नागपुरात अफवेमुळे उसळलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर यांनी बंगळुरूमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत बोलताना हा मुद्दा आता अप्रासंगिक असल्याचे स्पष्ट केले. ३०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला औरंगजेब आजच्या काळात महत्त्वाचा आहे का? आणि त्याची कबर हटवली पाहिजे का? असा प्रश्न आंबेकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा मुद्दा आता प्रासंगिक नाही.
सोमवारी नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजासाठी हितकारक नाही. पोलिसांनी याची दखल घेतली आहे आणि आम्हीही तपशील जाणून घेऊ.
सोमवारी नागपुरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यानंतर संध्याकाळी धार्मिक मजकूर लिहिलेले वस्त्र जाळल्याचा आरोप करत जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ”हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. आम्हाला दगडांनी भरलेली ट्रॉली आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत, जी जप्त करण्यात आली आहेत. हिंसाचार करणाऱ्यांनी निवडक घरं आणि संस्थांना लक्ष्य केलं होतं.”
RSSच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच आणि वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या ३२ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत बांग्लादेशातील हिंदूंवरील अन्याय आणि संघाच्या आगामी कार्यप्रणालीबाबत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर होणार आहेत. आंबेकर यांनी स्पष्ट केले की, ”बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराबाबत सर्वजण जागरूक आहेत. हिंदू जगात कुठेही असले तरी त्यांचा सन्मान आणि सुरक्षा यावर आम्ही ठाम आहोत”.
RSSच्या स्थापनेच्या १०० वर्षांच्या प्रवासानिमित्त ‘पंच परिवर्तन’ नावाचा विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात – समानता आणि बंधुता वाढवणे ,पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ,कौटुंबिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि नागरी जबाबदारीला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.तसेच, संघाच्या वेबसाईट्सद्वारे संपर्क साधणाऱ्या तरुणांची संख्या आता १.२ लाखांहून अधिक झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीत १६व्या शतकातील पोर्तुगीजांविरुद्ध लढणाऱ्या वीर महिला शासक अब्बक्का चौटा यांना संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
Leave a Reply