अंबाजोगाई, बीड: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले एक नवजात बाळ अंत्यसंस्कारासाठी नेत असताना अचानक रडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील होळ येथील एक महिला सोमवारी रात्री प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली होती. रात्री तिने एका मुलाला जन्म दिला, परंतु बाळ कमी दिवसांचे आणि केवळ ९०० ग्रॅम वजनाचे असल्याने जन्मानंतर त्याची कोणतीही हालचाल नव्हती. यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नातेवाईकांनी बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आणि त्याला होळ येथे नेण्यात आले. अंत्यसंस्काराच्या विधी सुरू असतानाच एका वृद्ध महिलेने बाळाला उघडून पाहिले असता, तिला बाळाची हालचाल दिसली. त्या महिलेने बाळाला कुशीत घेताच, बाळ रडू लागले आणि ते जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराने उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. नातेवाईकांनी तात्काळ त्या बाळाला पुन्हा डॉक्टरांकडे नेले.
या घटनेवर बोलताना स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, डॉ. गणेश तोडगे यांनी सांगितले की, “प्रसूतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले होते आणि त्याचे वजन केवळ ९०० ग्रॅम होते. जन्मानंतर त्याची हालचाल नसल्याने असा प्रकार घडला असावा.” दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी सांगितले की, “या घटनेचा अहवाल तत्काळ विभागप्रमुखांकडून मागवला आहे आणि चौकशीसाठी समिती नेमली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.” या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या निदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी गंभीर चूक पुन्हा होऊ नये यासाठी योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक आहे.
Leave a Reply