शांघाय : चीनमधील शास्त्रज्ञांनी असा क्रांतिकारी प्रयोग सुरू केला आहे, ज्यामुळे भविष्यात आईच्या गर्भाशिवाय बाळ जन्माला येऊ शकते. नानजिंग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील डॉ. झांग यांच्या नेतृत्वाखालील टीमने जगातील पहिला “बाळ वाढवणारा रोबोट” तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या यंत्राच्या सहाय्याने बाळाला पूर्ण नऊ महिने कृत्रिम पिशवीत ठेवून सुरक्षित वाढवले जाऊ शकते. रोबोटच्या पोटात बाळाला पोषणद्रव्ये आणि ऑक्सिजन ट्यूबद्वारे पुरवले जाणार आहेत. त्यामुळे मानवी गर्भाशयाची गरज भविष्यात कमी होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वामुळे संततीसुखापासून वंचित राहिलेल्या लाखो जोडप्यांना आशेचा किरण मिळू शकतो.
मात्र या प्रयोगामुळे सामाजिक आणि नैतिक प्रश्नांचा भडका उडाला आहे. रोबोटच्या पोटातून जन्मलेल्या बाळांचे पालकांशी भावनिक नाते कसे असेल? अशा मुलांचा मानसिक विकास नैसर्गिक राहील का? तसेच अंडाणू आणि शुक्राणू कुठून उपलब्ध केले जातील? असे प्रश्न चर्चेत आले आहेत. या संशोधनाचा पाया २०१५ मध्ये अमेरिकेत घालण्यात आला होता. तेव्हा शास्त्रज्ञांनी मेंढ्यांच्या अर्भकांना कृत्रिम पिशवीत वाढवून पाहिले होते. चीनमधील ताज्या प्रयोगामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या जगातील सुमारे १५ टक्के जोडपी वंध्यत्वामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी हा शोध मोठा दिलासा ठरू शकतो. परंतु, नैतिकता, कायदेशीरता आणि सामाजिक परिणाम यांबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने या प्रयोगाविषयी जगभरात चर्चेला उधाण आले आहे.
Leave a Reply