बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंना सोडून स्वतंत्र लढण्याचा भाई जगतापांचा इशारा

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांसोबत युती करणार नाही, असा ठाम इशारा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (मविआ) आणि मनसेसोबतच्या संभाव्य समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

“राज ठाकरे सोडाच, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असताना हीच भूमिका घेतली होती,” असं जगताप यांनी स्पष्ट सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेत्यांच्या नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे या निवडणुका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

भाई जगताप यांच्या वक्तव्यावर मनसेनं तातडीने प्रतिक्रिया दिली. मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले, “त्यांचे वक्तव्य त्यांनाच लखलाभ. आमच्यासाठी राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील, त्यावर आम्ही काम करू.” तर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना “भाई जगताप यांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली, पक्षाची अधिकृत भूमिका नाही,” असा बचावात्मक सूर घेतला.

दरम्यान, या विधानाची नोंद विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याही पर्यंत पोहोचली आहे. “भाई जगताप यांची भूमिका वैयक्तिक असून, पक्षाची अधिकृत भूमिका लवकरच जाहीर होईल,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, काँग्रेसच्या बैठकीत “मुंबईत काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व टिकवावं” यावर चर्चा झाल्याचं खासदार वर्षा गायकवाड यांनीही मान्य केलं.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला असताना, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय गणितं पुन्हा बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *