भांडुपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतरही दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरूच

मुंबई: भांडुपमधील एका धक्कादायक घटनेत, अडीच वर्षांच्या चिमुकल्याला भुताटकी उतरवण्याच्या नावाखाली चटके देऊन आणि वेताच्या छडीने मारहाण करणाऱ्या दाम्पत्याने अटकेनंतर पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरूच ठेवला होता. मात्र, भांडुप पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्यांना अटक करत त्यांचा ‘भूत’ उतरवला. धक्कादायक बाब म्हणजे, हे दाम्पत्य अनाथ मुलांसाठी एक संस्था उघडण्याच्या तयारीत होते, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. भांडुपच्या जंगल मंगल रोडवरील जेबीएस इमारतीत राहणारे वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव-कोकरे हे विकृत दाम्पत्य १४ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्याच आठवड्यात त्यांनी लग्न केले होते. हर्षदा पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करत होती. तक्रारदार मार्गी कदम मुलासोबत पळून गेल्यानंतर कोकरे दाम्पत्यानेही घराला कुलूप लावून लपायला सुरुवात केली.
पोलिसांनी अशी केली अटक

बुधवारी दुपारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात येताच, सहायक पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि पोलीस निरीक्षक महेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश नडवीनकेरी यांनी आरोपीचे घर गाठले, तेव्हा तेथे टाळे होते. त्यांनी आरोपींचे लोकेशन काढले, तेव्हा ते घणसोली येथे असल्याचे समजले. घणसोली येथे पोहोचल्यावर अविनाश नडवीनकेरी यांनी इमारतीत चौकशी सुरू केली असता, आरोपींची रिक्षा आणि दुचाकी तिथे पार्क केलेली दिसली. त्यांनी तोच धागा पकडून कोकरेला कॉल केला. सोसायटीच्या तक्रारीनंतर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त केल्याचे त्यांनी सांगितले आणि कागदपत्रे घेऊन तात्काळ येण्यास सांगितले. हे ऐकून कोकरे तिथे आला आणि अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

अघोरी साहित्याला जप्त
पोलिसांनी आरोपीच्या घरातून जादूटोणा संबंधित सात पुस्तके, नारळ आणि अघोरी कृत्यांसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. दोघांना ही विद्या कोणी शिकवली? यामध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे? त्यांनी आणखी कोणावर जादूटोणा केला होता का? या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *