छत्रपती संभाजीनगर: खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून ही चौकशी सुरू असून, जावेदला मिळालेल्या कथित बक्षीस स्वरूपातील जमिनीवरून वाद पेटला आहे. याप्रकरणी सालारजंग कट्रबातील वंशज मीर महेमूद अली खान यांच्याकडूनही तीन दिवसांचा अवधी मागण्यात आला आहे. ही जमीन मीर महेमूद अली खान यांच्या काल्डा कॉनेर येथील ३ एकर जमिनीशी संबंधित आहे. अँड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन ९० लाख ते १ कोटी रुपयांच्या व्यवहारात त्यांच्या नावे विक्री करार (Agreement to Sell), नोंदणीकृत मुखत्यारपत्र (Registered Power of Attorney) आणि हिबानामा (Gift Deed) करून दिली होती. असे असतानाही, महेमूद अली यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन चालक जावेद रसूल शेख यांच्या नावे त्याच जमिनीचा बनावट हिबानामा करून दिल्याचा आरोप अँड. मुजाहिद यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे.
सोमवारी सकाळी ११:३० वाजता जावेद आपल्या वकिलासह पोलीस आयुक्तालयात हजर झाला. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनी जावेदची एकट्यात चौकशी करत प्रश्नांचा भडिमार केला. चौकशीदरम्यान, जावेदने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्याने सालारजंगच्या वंशजांसोबत नाते असल्याने जमीन मिळाल्याचा दावा केला होता. पोलिसांनी त्याला या नात्याचे सबळ पुराव्यासह सिद्ध करण्याची सूचना केली आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देऊन त्याला रात्री ८ वाजता सोडण्यात आले.।दरम्यान, मीर महेमूद अली खान यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी अर्ज करून तीन दिवसांची मुदत मागितली आहे. राजकीय नेत्याच्या चालकाला १५० कोटी रुपयांची जमीन बक्षीस म्हणून कशी मिळाली, या मुद्द्यावरून शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी मंगळवारीही सुरू राहणार आहे.
Leave a Reply